Hariyal Nature Club
Save the nature..Save the human..!
to protect the nature
हरियाल महाराष्ट्राचा राज्य पक्षी
......................................
हरियाल (शास्त्रीय नाव: Treron phoenicoptera) हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा 'राज्यपक्षी' आहे. याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा हिरव्या रंगाचे कबूतर या नावांनीही संबोधले जाते. हा पक्षी दुर्मिळ झाला आहे. याचे शास्त्रीय नाव आहे ‘ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा’.
पाचू-कवडा नावाचे जे कबूतर आहे त्याच्या अंगावरील पाचूसारखी हिरवी झाक व पिवळ्या, निळ्या, जांभळ्या अशा कितीतरी रंगांच्या छटा हरियालाच्या अंगावर असतात.
हरियाल हा कबुतरासारखाच घुमतो. कधीकधी चिर्र... चिर्र... आवाज करत फिरतो. नर आणि मादी हरियल यांच्यात बाह्यतः फरक दिसत नाही.
गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर जातीची झाडे. हे पक्षी नेहमी थव्यानेच उडतात. पक्षीनिरीक्षणांच्या वेळी हरियाल सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसल्याच्या नोंदी सापडतात. म्हणून या पक्ष्याला विहारासाठी सकाळ आवडत असावी असे दिसते.
विणीचा हंगाम मार्च ते जून महिने या कालावधीत असतो. या काळात उंच झाडावरच्या काड्यांनी बनलेल्या घरट्यांत हे पक्षी अंडी घालतात.
मध्यवर्ती भारतापासून ते उत्तरेकडील सर्व राज्यांत याचा वावर आहे. हा पक्षी गुजरात, बंगाल, राजस्थान, पंजाब व आसाम येथील अभयारण्यांतून दिसून येतो. तसेच पाकिस्तान आणि श्रीलंका येथेही हरियाल सापडतो.
वृक्षतोडीमुळे हरियाल पक्षी आपली मूळची वास्तव्याची ठिकाणे सोडून नवीन जागा शोधताना दिसतात. यांना अस्तित्वाचा धोका उत्पन्न झाला आहे. या पक्ष्यांची संख्या वाढवायची असेल तर त्यांच्या राहण्याच्या ठिकाणांची जोपासना करणे आवश्यक आहे. (माहितीचा आधारः विकिपिडिया)
......................................
निसर्ग मित्रांनो.... हरियाल नेचर क्लब.... हे नाव आपल्या नेचर क्लबला ठेवण्याचे कारण हेच की राज्य पक्षीच जर दुर्मिळ झाला तर इतर पक्ष्यांचे काय. तो दुर्मिळ झाला कारण आपण निसर्गावर अफाट आक्रमण केले आहे. निसर्ग संपवण्याच्या कृत्यामुळे हरियाल संपतो आहे. उद्या हरियालची जागा माणूस घेणार आहे....!
त्यामुळे आपण हरियालच्या नामस्मरणाने या निसर्गाला मुंगीला, पशुपक्ष्यांना,झाडे-वेली-लता, मानवतेला पुरक असे काम करण्याचा प्रयत्न करूया.